Wednesday 29 April 2015



"पंढरपूरच्या वारीत सामान्य भाविक म्हणून सामील व्हायची अनेक वर्षांपासूनची मनात इच्छा आहे, पण ती अजून पूर्ण करता आलेली नाही."
"तुमचे पुस्तक पाहून वारीत सामील झाल्याचे समाधान मिळाले."
पुस्तकातील छायाचित्रांमध्ये आम्हाला आमचे काका, मामा, आजोबा, आत्या, मावश्या, काकू दिसतात."

यासारख्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या. आपल्याला मिळालेला अनुभव छायाचित्रांमधून पोचवणे अथवा व्यक्त करणे हे वाचकांना आवडल्याचे जाणवत होत.

वारीतील इतर अनेक छायाचित्रे असताना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हेच छायाचित्र का निवडले? असा प्रश्न ही अनेकांनी विचारला.

पुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना वारी करविली व चंद्रभागेत स्नान घातले, तशीच आपल्या आई-वडिलांची सेवा करताना वारकरी दिसतात. वारीतला हा क्षण मला महत्वाचा वाटल्यामुळे तो मुखपृष्ठावर येणे मला योग्य वाटले. या प्रसंगामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दलची आत्मियता प्रकर्षाने दिसते.

 पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हे चित्र पाहून २००८ साली मला गडहिंग्लज तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत नाईक यांचे पत्र आले. त्यांना मुखपृष्ठावरील चित्राच्या दोन प्रती हव्या होत्या. पुस्तकाच्या सागंली येथे झालेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त त्यांची व माझी समक्ष भेट झाली. त्या भेटीदरम्यान असे कळले की मुखपृष्ठावरील चित्रात स्नान घालणारी माणसे त्यांच्या कुटुंबातली तर नव्हतीच पण ती त्यांच्या ओळखीची किंवा एकाच दिंडीतलीदेखील नव्हती.

वडीलधारी व्यक्ती एकटेच स्नान करताना पाहून त्यांनी ती आपल्याच कुटुंबातील, असे समजून त्यांना स्नान घातले.

या मिळालेल्या नव्या माहितीमुळे मी टिपलेला प्रसंग आता एका वेगळ्याच पातळीवर पोचला.

 - संदेश भंडारे
+91 9422309923
warianandyatra@gmail.com